Aarop - Khara Ki Khota?

आता कॉलेज आलं की अभ्यास आला, करियरचे विचार आले आणि त्याचबरोबर येणारी मौज आणि मस्तीही. त्याच्या बरोबरच येतं ते हवंहवंसं वाटणारं हलकंफुलकं प्रेम, जीव ओवाळून टाकावा अशी मैत्री, एकमेकांना सांभाळून घेताना केलेल्या कसरती, विजयाचा उन्माद, पराकोटीचा आनंद आणि सलणारं दुःखही.

अपरिहार्यपणे याला समांतर चालते ती तिटकारा यावा अशी गटबाजी, इर्षा, मत्सर, हेवेदावे आणि कट्टर दुश्मनी.

हे हेवेदावे, इर्षा किंवा दुश्मनी टोकाला पोहोचली तर अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ नाही लागत. कधीकधी कॉलेजच्या शिस्तीच्या बाहेर जाऊन ती कायद्याच्या कचाट्यात अडकते आणि मग सुरू होते ती एक जीवघेणी घुसमट.

प्रेमाचा हलका गुलाबी रंग बदलत बदलत अचानक भडक लाल होतो. एकमेकात हरवलेल्या त्या जीवांची ताटातूट होते. प्रेमात आकंठ बुडालेला तो अनपेक्षितपणे खुनाच्या एका आरोपात अडकतो.

त्यानं खरंच तो अपराध केला असेल? का कुणीतरी त्याच्या मागून आपला स्वार्थ साधला असेल? कोण उकल करेल याची?

बेधुंद प्रेम आणि निखळ मैत्री यांच्या भोवती अंगावर काटा आणणाऱ्या रहस्याचं जाळं विणणारी एक अनोखी आणि रोमहर्षक कादंबरी